सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत!

सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत!

दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16 डिसेंबरोजी ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. काँग्रेसच्या मुख्यालयात सोनिया गांधी त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवणार आहेत. दरम्यान अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी या पुढे काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु या प्रश्नाचं उत्तर सोनिया गांधी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिलं. यापुढे तुम्ही काय करणार असा प्रश्न विचारला असता आता मी निवृत्त होणार असं मिस्कील उत्तर त्यांनी दिलं आहे.

सोनिया गांधी यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या निवृत्त होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु आपण राजकारणातून मात्र निवृत्त होणार नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. गेली काही दिवसांपासून सोनिया गांधींनी स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. गुजरात विधानसभा आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही त्यांनी सहभाग घेतला नव्हता. त्यांची प्रकृती बिघडल्याच्याही काही बातम्या मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. त्यामुळेच त्या काँग्रेस अध्यक्षपदावर फार काळ राहणार नाहीत हे स्पष्ट झाले होते.

सोनिया गांधी १९९८ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या होत्या. मागील १९ वर्षात त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने दोनवेळा देशाची सत्ता काबीज केली होती. आता मात्र त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचे सांगितले आहे.

 

COMMENTS