“…तर पंकजा मुंडेंची चौकशी होणार!”

“…तर पंकजा मुंडेंची चौकशी होणार!”

नागपूर – हिवाळी अधिवेशनादरम्यान बचत गट आणि सॅनिटरी नॅपकीन खरेदीबाबत विधान परिषदेची विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केला होता. या आरोपामध्ये काही तथ्य आढळलं तर पकंजा मुंडे यांची चौकशी करू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

चिक्की घोटाळ्याचे आरोप असणा-या कंपनीलाच सॅनिटरी नॅपकीनचं कंत्राट दिलं असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केला होता.परंतु त्यांचे सर्व आरोप पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावले होते. तसेच हे कंत्राट अजून कोणालाच दिलं नसल्याचंही स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. महिला बचतगटांना ग्रामीण भागातल्या महिलांच्या फायद्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स कमी किंमतीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून नियमात राहून याबाबत निविदा काढण्यात आली असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.तसेच यामध्ये सरकारचा पैसा गुंतवला नसून महिला बचत गट या नॅपकिन्सची खरेदी करून विक्री करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर यामध्ये काही तथ्य आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करु असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS