१९९५ मध्ये जर शिवसेना-भाजपची युती झाली नसती तर आम्ही इथंपर्यंत पोहोचलोही नसतो – मुख्यमंत्री

१९९५ मध्ये जर शिवसेना-भाजपची युती झाली नसती तर आम्ही इथंपर्यंत पोहोचलोही नसतो – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळे आम्हाला प्रेरणा मिळायची. त्यांची नागपूरला सभा होणार म्हटल्यानंतर सभेच्या ४ दिवस आधी आणि सभेच्या ४ दिवस नंतर आम्ही त्यावर चर्चा करत असू, त्यावेळी आम्ही खूप छोटे कार्यकर्ते होतो. मातोश्रीच्या बाहेर जरी उभा राहायला मिळालं तरी भारी वाटायचं, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान १९९५ मध्ये जर शिवसेना-भाजपची युती झाली नसती तर आम्ही इथंपर्यंत पोहोचलोही नसतो, असे फडणवीस यांनी खुल्या मनाने सांगितले. तसेच ९५ च्या युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘रिमोट कंट्रोल’विषयी मोठी चर्चा होती. याविषयी ठाकरे चित्रपटाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी आज ‘रिमोट कंट्रोल’ असता तर काय झालं असतं, असा प्रश्न विचारला त्यावर बोलताना त्यांनी क्षणाचाही वेळ न घेता ‘फार आनंद झाला असता’ असं म्हटलं.‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

COMMENTS