दिल्लीत काँग्रेसचं महाअधिवेशन, पुढील निवडणुकांची दिशा ठरणार !

दिल्लीत काँग्रेसचं महाअधिवेशन, पुढील निवडणुकांची दिशा ठरणार !

नवी दिल्ली –  काँग्रेसच्या महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी भाषण करणार आहेत. तसेच आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पुढील दिशा काय असेल, यावर आज काँग्रेस अधिवेशनात महत्त्वाची खलबतं होणार असल्याची माहिती आहे. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित आहेत.

दरम्यान या अधिवेशनाला देशभरातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आहे. तसेच येत्या काही दिवसात कर्नाटक विधानसभा निवडणुका आहेत. त्यापाठोपाठ राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काँग्रेसची काय भूमिका असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आगामी काळात सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसकडून रणनिती आखली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना सोनिया गांधी यांनी स्नेहभोजन दिलं होतं. तसेच राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास उंचावला असून पुढील रणनिती काय असणार ते या अधिवशनानंतर समजणार आहे.

COMMENTS