नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाला बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागल्यामुळे आता पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहे. डिजीटल पद्धतीने काँग्रेसचा आगामी अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला असून एप्रिल महिन्यात ही निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी राहूल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी या दोघांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे.
पक्षाचा अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाला डिजीटल आयडी कार्ड जारी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीने त्यासाठी मतदार यादीही तयार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यांमधील सर्व युनिट्सकडून या ऑथेरिटीने एआयसीसी प्रतिनिधींचे डिजीटल फोटो मागवले आहेत. सुमारे 1500 प्रतिनिधी या निवडणुकीत भाग घेणार आहेत. एप्रिल महिन्यात ही निवड होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. अध्यक्षपद पुन्हा राहुल गांधी यांनाच देण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य कुणी दावा केल्यास ही निवडणूक नाट्यमय वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सन २०१९ च्या लोकसभा निवड़णुकीनंतर अध्यक्षपदाचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यामुळे या जागेवर निवडणूक होत आहे. राहुल गांधी निवडणुक लढविण्यास तयार न झाल्यास प्रियंका गांधी मैदानात उतणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
COMMENTS