दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी !

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी !

मुंबई – राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे. २००९ मध्ये अशाच प्रकारची अनुमती प्रदान करण्यात आली होती, याकडे मुख्यमंत्र्यांनी या पत्रातून लक्ष वेधले आहे. ही अनुमती दिल्यास दुष्काळी उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे होईल, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान वार्षिक आराखड्यात यापूर्वीच मंजूर असलेल्या विविध प्रकारच्या कामांच्या निविदा बोलावणे, निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे, कामांचे कंत्राट देणे याला सुद्धा परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यात दुष्काळाच्या सामना करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचं आहे. विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनालची देखभाल इत्यादी कामे ही तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात.

राज्य सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारने ४, ७१४ कोटी रूपये मदत जाहीर केली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक घेण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS