मुंबई – पावसाळी अधिवेशन येत्या चार जुलैपासून सुरु होत आहे. या अधिवेशनासाठी सत्ताधा-यांसह विरोधकही तयारीला लागले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली. यावेळी राज्यातील अनेक समस्यांवर चर्चा होऊन अधिवेशनातील संभाव्य रणनितीवर विचारविनिमय झाला. सर्व विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीत या रणनितीला अंतिम रूप दिले जाणार असल्याचं यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या अधिवेशनात 4 जुलै ते 20 जुलै असं एकूण 13 दिवसांचं कामकाज होणार आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशच्या वेळी संमत न झालेले आणि नवीन असे एकूण 20 पेक्षा जास्त विधेयके या अधिवेशनात मांडली जाणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान अशा विविध कारणांमुळे या अधिवेशनातही पुरवण्या मागण्या मांडल्या जाणार आहेत.
दरम्यान शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, वाढती महागाई अशा इतर मागण्यांबाबत विरोधकांकडून सरकारला घेरण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS