नगर-बीड-परळी रेल्वेची यशस्वी चाचणी,  स्वप्नपूर्ती, वचनपूर्तीचा आनंद – पंकजा मुंडे

नगर-बीड-परळी रेल्वेची यशस्वी चाचणी, स्वप्नपूर्ती, वचनपूर्तीचा आनंद – पंकजा मुंडे

बीड – नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला गती येत असून आज दुपारी नारायण डोह ते सोलापूरवाडी मार्गावर रेल्वेची जलदगती चाचणी रेल्वे विभागाने घेतली. ही चाचणी यशस्वी झाली असून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी या चाचणीमुळे स्वप्नपूर्ती आणि वचनपूर्तीचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नगर-बीड-परळी या २६१ किमी रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने दोन हजार ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, यात राज्य सरकारचा अर्धा हिस्सा आहे. बीडच्या जिव्हाळ्याचा बनलेला हा  प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांच्या पश्चात पालकमंत्री पंकजा मुंडे व खा डॉ. प्रितम मुंडे यांनी वेळोवेळी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला, त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज रेल्वेचे काम जलदगतीने पूर्ण होत आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकताच आष्टी तालुक्याचा दौरा करताना कडा येथे रेल्वे मार्गाची पाहणी केली होती व लवकरच या मार्गावर चाचणी होणार असल्याचे सांगितले होते. मध्य रेल्वेच्या अहमदनगर येथील उप मुख्य अभियंता (निर्माण) कार्यालयाने दोन दिवसांपूर्वीच  नारायण डोहच्या सरपंच व ग्रामस्थांना रेल्वे मार्गावर २५ तारखेला चाचणी होणार असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले होते त्यानुसार आज दुपारी ४ ते ६ वा. दरम्यान नारायण डोह ते सोलापूरवाडी मार्गावर रेल्वेची जलदगती चाचणी घेण्यात आली.

स्वप्नपूर्तीचा आनंद

बीड जिल्हयाच्या कानात झुक झुक..सत्तर वर्षाची प्रतिक्षा पुर्ण..विकासाचा बालेकिल्ला माझा बीड जिल्हा अशी फेसबुक पोस्ट करून सोलापूरवाडी पर्यंत रेल्वे धावली, स्वप्नपूर्ती आणि वचनपूर्ती झाली अशा शब्दांत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेच्या या यशस्वी चाचणीबद्दल आनंद व्यक्त केला.

COMMENTS