मुंबई – आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीबाबत सकारात्मक असल्याचं कालच अमित शाह यांनी म्हटलं होतं. याबाबत ते उद्धव ठाकरेंची भेटही घेणार असल्याची चर्चा आहे. परंत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर मी भाजपमध्ये नसणार असल्याचं वक्तव्य राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. त्यामुळे राणे यांच्या वक्तव्यानंतर भाजपची कोंडी होणार असल्याचं दिसत आहे.
राज्यातील मंत्रिमंडळात मला सहभागी करुन घेण्याबाबत शिवसेनेचा आक्षेप होता. माझा मंत्रिमंडळात समावेश झाला तर सत्तेतून बाहेर पडणार असल्याचा इशाराही शिवसेनेनं दिला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार असेल तर माझ्या भाजपमध्ये राहण्याला अर्थ नसल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना हाच शत्रू पक्ष असेल. पण भाजप-शिवसेना युती झाल्यास माझी भूमिका स्पष्ट असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राणे यांच्या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी होणार असल्याचं दिसत आहे. कारण आतापर्यंत भाजपची भूमिक राणे आणि शिवसेनेला सोबत घेऊन जाण्याची असल्याचं दिसून आलं आहे. शिवसेनेच्या नाराजीमुळे राणेंना राज्यातील मंत्रिमंडळात न घेता त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं आहे. तसेच आगामी निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेऊन जाण्याचा इरादा भाजपचा आहे. मात्र राणे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजपकडून नेमका कोणता मार्ग काढला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS