मुंबई – ‘चित्रपटात नाचणारीसाठी माझे राज्यसभेचे तिकीट कापले गेले’, या खालच्या पातळीवर उतरून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांच्यावर टीका केली होती. या वक्तव्यावरुन अग्रवाल यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यांसह अनेक नेत्यांनी सुनावलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पडसाद उमटत असल्याचं पाहताच नरेश अग्रवाल यांनी अखेर माफी मागितली आहे.
दरम्यान नरेश अग्रवाल यांना राज्यसभेसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. समाजवादी पक्ष सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी थेट जया बच्चन यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘चित्रपटात नाचणारीसाठी माझे राज्यसभेचे तिकीट कापले गेले’ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अग्रवाल यांना ट्वीटरवरुन चांगलंच सुनावलं होतं. ‘अग्रवाल यांचे भाजपमध्ये स्वागत आहे. मात्र जया बच्चन यांच्याविषयीचे त्यांचे उद्गार अयोग्य व अस्वीकारार्ह आहेत’, अशा शब्दांत त्यांनी अग्रवाल यांना त्यांची जागा दाखवली होती.
तसेच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिल्याने निराश झालेल्या राजीव शुक्ला यांनीही राज्यसभेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले असल्याचं पहावयास मिळालं आहे. शुक्ला यांनी गुजरातमध्ये काँग्रेसचे नारायणभाई रथवा यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचा दावा करीत त्यांनी अहमदाबाद गाठण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अहमदाबाद गाठता येत नसल्याचे पाहता त्यांनी मुंबईकडे आपला मोर्चा वळवला होता परंतु शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमुळे ते विधान भवनापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मागे लागलेले राजीव शुक्ला आणि नरेश आग्रवाल यांची चांगलीच गोची झाली असल्याचं दिसून आलं आहे.
COMMENTS