औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा –आमदार सतीश चव्हाण

औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा –आमदार सतीश चव्हाण

औरंगाबाद – महानगरपालिकेत अशा गोष्टी घडत आहेत की आता तिथे राज्य सरकारला हस्तक्षेप करावा लागणार आहे. तसेच औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी आम्ही करत असून त्याशिवाय या महापालिकेत एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त पाठवण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. निवृत्त व्हायला आलेला किंवा शिक्षा म्हणून औरंगाबादला आयुक्त पाठवल्यामुळेच या मनपामध्ये अनागोंदी कारभार सुरु असल्याची टीकाही सतीश चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी औरंगाबाद मनपाचे महापौर व नगरसेवक तीन वेळा परदेशात अभ्यास दौर्‍यासाठी जाऊन आले आहेत. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी या नगरसेवक, महापौरांकडून परदेश अभ्यास दौऱ्याचा अहवाल मागवून घ्यावा अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे. तसेच खदाणीमध्ये कचरा टाकला तर सहा किमी परिघातील पाणी दुषित होऊ शकण्याची भीती आहे. जसे नरेगाव येथे कचर्‍यामुळे गावकरी त्रस्त झाले. त्याप्रमाणेच खदाणीच्या आजुबाजुला राहणाऱ्या लोकांनाही याचा त्रास होऊ शकतो असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच कचर्‍याचा प्रश्न सुटेपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली असून मुख्यमंत्री कचर्‍याचा प्रश्न सोडवण्यासाठी जो निधी देणार आहेत, तो खर्च करण्याची व्यवस्था करावी असंही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानपरीषदेतील आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

COMMENTS