आणखी एक ठाकरे राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत ?

आणखी एक ठाकरे राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत ?

मुंबई – आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेनं मुंबई विद्यापीठातील सिनेटवर दहा पैकी दहा जागा जिंकून मोठा इतिहास रचला आहे. याबाबत त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे. यासोबत आदित्य ठाकरे यांचे छोटे बंधू तेजस ठाकरे यांनीही आदित्य ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. सामना या वृत्तपत्रात जाहिरात दिली असून या जाहिरतीत त्यांचा फोटो झळकत आहे. राजकीय जाहिरातीत तेजस ठाकरे यांचा फोटो झळकला असल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून आता आणखी एक ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छोटे पूत्र असणारे तेजस आतापर्यंत तरी राजकारणापासून दूर असल्याचं पहावयास मिळालं आहे. यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी मुंबईतील काही शाखांची पाहणी केली होती. त्यानंतर तेजस ठाकरे हे राजकारणात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांना ज्यावेळी राजकारणात त्यावेळेस ते करु शकतात असं म्हटलं होतं. त्यामुळे आता तेजस यांची राजकारणात एन्ट्री मारण्याची वेळ आली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच युवासेनेच्या जाहिरातीत त्यांचा फोटो झळकत असल्यामुळे आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

 

 

COMMENTS