राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा, काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देणार ?

राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा, काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देणार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठ्ठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच ते पक्षालाही सोडचिठ्ठी देतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेकदा युती सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला होता. परंतु अहमदनगरची जागा न मिळाल्याने नाराज असलेले त्यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे स्वत:चाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने, विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही, या भावनेतून त्यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

परंतु आपण अजून राजीनामा दिला नसून पक्ष जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली आहे.

COMMENTS