शिवाजी महाराजांची जयंती राष्ट्रीय सण म्हणून घोषित करा, संभाजी ब्रिगेडचं मोदींना पत्र

शिवाजी महाराजांची जयंती राष्ट्रीय सण म्हणून घोषित करा, संभाजी ब्रिगेडचं मोदींना पत्र

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी एकाच दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर साजरी करुन तो राष्ट्रीय सण म्हणून घोषीत करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ देशभर व जगभर एकाच वेळी पोहोचले, समजले पाहिजेत. हा शिवप्रेमी म्हणून आमचा उद्देश असून तारीख आणि तिथीचा वाद न घालता सर्वांनी एकत्र येऊन ‘शिवजयंती’ हा उत्सव राष्ट्रीय ‘सण’ म्हणून साजरा केला पाहिजे अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या मागणीसाठी गेली ५ वर्षापासून संभाजी ब्रिगेडकडून पंतप्रधानांना पत्र लिहिण्यात येत आहे. परंतु या पत्राकडे पंतप्रधान कार्यालयाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे. यावर्षीही संभाजी ब्रिगेडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची प्रेरणा आहेत. तमाम शिवप्रेमींची प्रेरणादाई अस्मिता आहेत. शिवरायांचा इतिहास जगाला प्रेरणा देणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातींना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले. ते सर्वांचा उत्तम आदर करायचे. म्हणून महाराज ‘कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक’ आहेत. त्यामुळे ते देशाला समजले पाहिजेत यासाठी त्यांची जयंती देशभर एकाच दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड, पुणे जिल्ह्याच्यावतीने करण्यात आली आहे.

तसेच २०१२-१३ पासून या मागणीसाठी पत्रव्यवहार सुरू असून जोपर्यंत शिवजयंती देशभर साजरी होत नाही आणि तो राष्ट्रीय सण म्हणून घोषीत केला जात नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेड पाठपुरावा करत राहणार असल्याचं पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS