वाढदिवसादिवशीच शरद पवार सरकारविरोधात रस्त्यावर, तब्बल ३० वर्षांनंतर सरकारविरोधात आंदोलन

वाढदिवसादिवशीच शरद पवार सरकारविरोधात रस्त्यावर, तब्बल ३० वर्षांनंतर सरकारविरोधात आंदोलन

नागपूर – नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ घातला. शेतकऱ्यांची रखडलेली कर्जमाफी, आणि जाहिरातबाजीवर होणारा वारेमाप खर्च यासंदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांनी काल जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते.आज विरोधकांचा विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे. त्यासाठी कालापासूनच राज्यभरातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी-काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गुलाम नबी आझाद हे या मोर्चाचं नेतृत्त्व करणार आहेत. भाजप सरकारविरोधात पवार आणि आझाद रस्त्यावर उतरणार आहेत. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसह, काँग्रेस, शेकाप, सपाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असून आजच्या दिवशीच ते राज्य आणि केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.

पवार यांनी आज 77 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पवारांनी आधीच राजकारणात 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या राजकीय प्रवासात शरद पवारांनी महाराष्ट्र आणि केंद्रात अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. तसेच शरद पवार 30 वर्षांनी विद्यमान सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत. याआधी 1985 मध्ये त्यांनी तत्कालीन राज्य सरकारविरोधात सायकल मोर्चा काढला होता. जळगावातून सुरु झालेला हा सायकल मोर्चा नागपुरात संपला होता.

12 वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते दीक्षाभूमीजवळ एकत्र येऊन मोर्चाला सुरुवात करणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धनवटे कॉलेजजवळ एकत्र येऊन विधानभवनाच्या दिशेने मार्गस्थ होतील. त्यानंतर दोन्ही पक्षांचे मोर्चे एकत्रितपणे विधानभवनावर धडकणार आहेत. विरोधकांच्या या मोर्चाकडे राज्यभरासह सरकारचंही लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS