राजू शेट्टींच्या गळ्यात काँग्रेसचंच मंगळसूत्र – शेतकरी संघटना

राजू शेट्टींच्या गळ्यात काँग्रेसचंच मंगळसूत्र – शेतकरी संघटना

सांगली  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर शेतकरी संघटनेनं जोरदार टीका केली असून राजू शेट्टी यांच्या गळ्यात काँग्रेसचंच मंगळसूत्र असून ते मुळचे काँग्रेसचेच असल्याची टीका शरद जोशी प्रणित शेतकरी संघनेचे नेते संजय कोले यांनी केली आहे. राजू शेट्टी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीनंतर त्यांनी ही टीका केली असून राहुल गांधींसोबतच्या भेटीतून ते मूळचे काँग्रेसचेच असल्याचं आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हे काँग्रेसचं असल्याचं सिद्ध झालं आहे असं कोले यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर वेगवेगळ्या कायद्यातून टाच आणली त्याच काँग्रेससोबत राजू शेट्टी काही दिवसात गेलेले दिसतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल राजू शेट्टींनी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजू शेट्टी आता यूपीएची साथ देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. परंतु येत्या 29 मार्च रोजी देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी राजू शेट्टींनी राहुल गांधींची भेट घेतली असल्याची माहिती आहे. परंतु राहुल गांधी आणि राजू शेट्टींच्या भेटमुळे आता शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला असून राजू शेट्टींवर जोरदार टीका केली आहे.

 

COMMENTS