श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योर्तिलिंगाच्या 112 कोटीच्या विकास आराखडयास शिखर समितीची मंजुरी !

श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योर्तिलिंगाच्या 112 कोटीच्या विकास आराखडयास शिखर समितीची मंजुरी !

मुंबई – सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग 211 लगत एैतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या येळगंगा नदीकाठच्या श्री घृष्णेश्वर ज्योर्तिलिंग परिसराच्या विकासासाठी 112 कोटी 41 लाखांचा हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडयावर बैठकीत सविस्तर चर्चा आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योर्तिलिंग परिसराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या तिर्थक्षेत्र परिसरात त्यांनी बैठकी घेऊन परिसराच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांना निर्देशही दिले होते. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी शासनाला सदर विकास आराखडा सादर केला होता.

दरम्यान राज्यातील पाचही ज्योर्तिलिंगाच्या ठिकाणचा सर्वांगिण विकास करण्याचा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मानस असून नुकताच पुणे जिल्हयातील भिमाशंकर ज्योर्तिलिंग तिर्थक्षेत्र विकासासाठी 180 कोटींच्या विकास आराखडयास मंजूरी देण्यात आली आहे.  श्री क्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखडयासाठी जुलै 2018 च्या पुरवणी अर्थसंकल्पात 25 कोटी रु. निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. प्रशांत बंब, संबंधित सर्व विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी राम नवल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आरदड,  आर्किटेक्ट प्रदिप देशपांडे यांच्यासह  अनेक अधिकारी उपस्थित होते.

 

COMMENTS