डीजेच्या कारणावरुन राडा, शिवसेनेच्या खासदाराविरोधात तलवारीने वार केल्याची पोलिसांत तक्रार !

डीजेच्या कारणावरुन राडा, शिवसेनेच्या खासदाराविरोधात तलवारीने वार केल्याची पोलिसांत तक्रार !

परभणी – डीजेच्या कारणावरून परभणीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. शिवसेनेचे खासदार बंडू जाधव आणि त्यांच्या इतर 6 सहका-यांनी तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. वसंत मुरकुटे असं तक्रार दिलेल्या व्यक्तीचं नाव असून राजकीय वैमनस्यातून बंडू जाधव आणि त्यांच्या सहका-यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मुरकुटे यांनी केला आहे. तसेच मुरकुटे यांच्या चेह-यावर जखम झाली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान थर्टी फस्टनिमित्त डीजे लावण्यासाठी वीजेचं कनेक्शन घेण्यावरुन वसंतु मुरकुटे आणि बंडू जाधव यांचे सहकारी कांबळे या दोघांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान शिवसेनेचे खासदार बंडू जाधव आणि त्यांच्या इतर सहका-यांनी मिळून मला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर तलवारीने वार केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसेच  वसंत मुरकुटे यांनी  आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार खासदार बंडू जाधव यांचे सहकारी कांबळे यांनीही पोलिसांमध्ये  दिली आहे. या प्रकरणात अद्यापपर्यंत कुणालाही अटक झाली नसून पंधरा दिवसांपूर्वीच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी खासदार बंडू जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खासदार बंडू जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS