नवी दिल्ली – आधार सक्तीबाबत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बँक खाते व मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. पुढील निर्णय येईपर्यंत ही मुदतवाढ असणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात आज याप्रकरणी सुनावणी होती. त्यावेळी आधार लिंक करण्यामध्ये मदतवाढ देण्यात आली आहे. तसेच न्यायालयाचा हा आदेश केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व योजना आणि अन्य बाबींसाठी लागू असणार आहे.
दरम्यान यापूर्वी ६ फेब्रुवारी २०१८ या तारखेवरून ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार जोडण्यास मुदत वाढवली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा मुदत वाढ देऊन देशातील लाखो लोकांना दिलासा दिला आहे. सध्या केंद्र सरकारच्या १३१ कल्याणकारी योजनांना आधारशी जोडण्यात आले असून खासगीपणाचा हा घटनात्मकदृष्टय़ा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्यानंतर आधारमुळे या अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करणाऱ्या अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यापैकी काही याचिकाकर्त्यांनी आधार क्रमांक बँक खाते आणि मोबाइल क्रमांकाशी जोडणे घटनाबाह्य़ असल्याचे म्हटले होते.
COMMENTS