वसंतदादा पाटील घराण्याची अस्वस्थता, पक्षबदलाचे संकेत की दबावाचे राजकारण ?

वसंतदादा पाटील घराण्याची अस्वस्थता, पक्षबदलाचे संकेत की दबावाचे राजकारण ?

सांगली – सहकारमहर्षी माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंत दादा पाटील यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्याची धुरा त्यांच्या कुटुंबियांनी समर्थपणे सांभाळली. त्यामुळे आजपर्यंत वसंतदादांच्या घराण्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा होता. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर वसंतदादांच्या घराण्याची जिल्ह्याच्या राजकारणात काही प्रमाणात पिछेहाट झाली. लोकसभेत प्रतिक पाटील यांचा पराभवापासून त्याची सुरुवात झाली. त्यात पाटील घराण्याचे पक्षांतर्गत विरोधक समजले जाणारे पतंगराव कदम घराण्याचा दबदबा यामुळे पाटील घराणे अस्वस्थ असल्याचं बोललं जातंय.

लोकसभेतील प्रतिक पाटील यांच्या पराभवानंतर पाटील घराणे जिल्ह्याच्या राजकारणापासून काहीसे दूर गेल्याचं चित्र आहे. त्यातच कदम घराण्याचा पक्षातला वाढता दबदबा यामुळे पाटील घराण्याची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद, राज्याचं युवक काँग्रेसचं अध्यक्षपद पतंगराव कदम यांच्या घरात आहे. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेची आमदारकीही कदम यांनी पदरात पाडून घेतली. आता लोकसभेसाठीही पतंगराव कदम यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेला आपला पत्ता कट होतो की काय अशी भीती पाटील यांच्या कुटुंबियाला आहे. तर सांगली विधानसभेसाठी ऐनवेळी राजकीय खेळी म्हणून दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना पुढं केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकाशबापू पाटील यांच्या गटाला काँग्रेसमध्ये राहून काय मिळणार असा प्रश्न त्यांच्या मुलांना पडलाय .

याच अस्वस्थेतून प्रतिक पाटील आणि विशाल पाटील यांनी याच आठवड्यात जिल्ह्याच्या दौ-यावर राज्यातली दोन दिग्गज नेत्यांचं स्वागत करुन राजकीय खेळी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीच्या दौ-यावर आले होते. तेंव्हा प्रतिप पाटील यांनी त्यांची भेट घेतली. तर काल माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनी वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेतलं तेंव्हा विशाल पाटील राणे यांच्यासोबत होते. प्रतिक पाटील आणि विशाल पाटील या भेटीमागे काहीही राजकीय अर्थ काढू नये म्हणत असले तरी त्यांनी संदेश द्यायचा तो दिलेला आहे.

भूतकाळात डोकावचं झालं तर शिवेसनेला वसंत दादा पाटील यांनी वेळोवेळी अप्रत्यक्ष मदत केली आहे. त्यामुळे शिवेसनेला नेहमीच दादा घराण्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. त्याचीच परतफेड शिवसेना आता सांगलीत दादा घराण्याला पक्षात घेऊन करु शकते. शिवसेनेलाही जिल्ह्यात तगडा नेता नाही. त्यातच जयश्री मदन पाटील यांची मुलगी पतंगराव कदम यांच्या भावाच्या नातवाला दिली आहे. त्यामुळे कदम गटाकडून जयश्री पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जाऊ शकतो. त्यामुळे सांगलीतून काँग्रेसकडून तिकीट मिळाले नाही तर शिवसेनेचा पर्याय असावा अशी चाचपणी विशाल पाटील करत असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसांपूर्वीच विशाल पाटील यांचे समर्थक नगरसेवक शेखर माने यांनी काही दिवसांपूर्वी हातात शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे  2019 मध्ये राजकीय समिकरणे कशी तयार होतात त्यावर प्रकाशबापू पाटील यांचा गटाची भूमिका ठरेल अशी राजकीय गोटात चर्चा आहे.

COMMENTS