कर्जमाफीवरुन उद्यापासून रणकंदन, पावसाळी अधिवेशात कर्जमाफीच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे !

कर्जमाफीवरुन उद्यापासून रणकंदन, पावसाळी अधिवेशात कर्जमाफीच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली असल्याने मुख्यमंत्री आणि भाजप नेते सध्या खुशीत असले तरी उद्यापासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनात त्यांना विरोधकांच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागणार आहे.  शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरुन गेल्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं होतं. त्यावेळी शिवसेनेनंही काही प्रमाणात का होईना विरोधकांच्या सुरात सूर मिळवला होता. आता कर्जमाफीच्या अमंबलबजावणी आणि निकषावरुन विरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. त्याला शिवसेनेचीही साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सरकारची अधीकच अडचण होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी अधिवेशनात विरोधकांनी कर्जमाफीची जोरदार मागणी केली होती. त्यानंतर विविध शेतकरी संघटना आणि पुणतांब्याच्या शेतक-यांचा संप यावरुन सरकारला कर्जमाफी जाहीर करावी लागली. तूरखरेदी आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा प्रश्न यावरुनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान सत्ताधा-यांविरोधात विरोधकांकडे दारुगोळा असला तरी त्याचा उपयोग कसा केला जातो यावर बरचं काही अवलंबून आहे. त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या मतांमध्ये झालेली फूट यामुळे विरोधकही काहीसे बॅकफूटवर आले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीमध्येही हवा तेवढा संवाद नाही. अधिवेशनाच्या आधी होणारी विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद आता वेगवेगळी होणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशाच्या आधी विरोधकच विभागले गेले असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे ते किती ताकदीनं सरकारविरोधात लढतात हेही पहावं लागेल.

COMMENTS