शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार

शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार

मुंबई – राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने कर्जमाफीची घोषणा करावी या मागणीसाठी उद्या विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ राज्यापालांची भेट घेणार आहे.  या शिष्टमंडळामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आ. जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आ.प्रा. जोगेंद्र कवाडे आदींचा समावेश असेल. विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

 

राज्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. राज्यातील शेतकरी मागील चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक संकटे व सततच्या नापिकीमुळे हवालदिल झाले आहेत. शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांना कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले आहे. कर्जाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी कोणतेही पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पडते आहे. या परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी, त्याच्या आत्मविश्वासाला उभारी मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. शेतकऱ्यांमध्ये नव्याने विश्वास निर्माण करायचा असल्यास तातडीने कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याची भावना विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून प्रकर्षाने समोर आली आहे. जीएसटीसाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने आयोजित केले जात आहे. त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी विधानमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

COMMENTS