सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शाैचालयावरून वाद

सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शाैचालयावरून वाद

एकीकडे ”स्वच्छ भारत अभियान” मोहिम राबवत असताना, दुसरीकडे अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान आणि प्रख्यात अभिनेत्री वहिदा रहेमान या सेलिब्रिटीजनी त्यांच्या घरासमोरील जागेत हाेत असलेल्या सार्वजनिक शाैचालय उभारणीला विराेध दर्शवला अाहे. हा वाद चांगलाच पेटला असून याला राजकारणाचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे स्वच्छतागृहाचे काम ठप्प झाले अाहे. काही नेत्यांनी याला विरोध दर्शविला तर काहींनी याला समर्थन दिले आहे.

सलीम खान यांचे बांद्रा पश्चिमेला गॅलक्सी अपार्टमेंट आहे. या ठिकाण टुरिस्ट स्पाॅट बनलेले आहे. सलमानच्या घरापासून प्रोमोनेड सुरू होतो. सकाळ-संध्याकाळी या प्रोमोनेडवर गर्दी होते. बांद्रा बँडस्टँड रहिवासी संघाकडून प्रोमोनेडची देखभाल केली जाते. या प्रोमोनेडला आठवड्याला सुमारे तीन लाख लोक भेट देतात. इतक्या गर्दीच्या ठिकाणात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याची नागरिकांची ओरड होती. त्यामुळे मुंबई महापालिकेने येथे पोर्टेबल टाॅयलेट उभारण्याचे ठरवले. त्यासाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र या स्वच्छतागृहाची उभारणी हाेत असतानाच त्याला विराेधही सुरू झाला. सलीम खान, अभिनेत्री वहिदा रहेमान यांनी सदर शाैचालयाची जागा बदलावी, अशी मागणी करणारा अर्ज मुंबईच्या महापौरांकडे केला. प्रोमोनेडवर नागरिक ध्यान, योगासाठी येतात. शाैचालयामुळे हा परिसर अस्वच्छ होईल, असे सलीम यांचे म्हणणे आहे. त्या अर्जावर स्थानिक दोनशे रहिवाशांच्या सह्या आहेत. सलीम खान यांचा अर्ज येताच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शाैचालयाची जागा बदलण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

 

COMMENTS