शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

कल्याण – नेवाळी विमानतळासाठी सरकारने जमीन संपादित केल्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत. पोलिसांच्या गाड्या पेटवून आणि रस्त्यावर टायर जाळून शेतकऱ्यांनी या प्रकाराला विरोध केलाय. डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील डावलपाडा गावाजवळ हे आंदोलन सुरु आहे. 

शेतक-यांना स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी नेवाळी, भाल आणि आसपासच्या परिसरातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी टायर जाळून आणि मुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला कल्याण-मलंगगड रस्ता रोखून धरला. त्यानंतर टायर जाळून आणि मोठमोठाली झाडं रस्त्यावर टाकून कल्याण-मलंगगडसह अंबरनाथ-बदलापूरकडे आणि नवी मुंबईकडे जाणारे रस्ते बंद केले. काही ट्रकची तोडफोड करीत पोलिसांच्या वाहनांनाही आग लावण्यात आली. या आंदोलनात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील जखमी झाले.

या संदर्भात गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शांततेत आंदोलन करीत होतो. मात्र आमच्या सरकारने मागण्यांची अजिबात दखल घेतली नाही. उलटपक्षी जबरदस्तीने आमच्या जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान ब्रिटीश काळात दुसऱ्या महायुद्धात लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या  ताब्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा नौदलाने या जागेवर दावा करत तिथे कम्पाऊंड टाकायला सुरुवात केली आहे. याला या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

 

COMMENTS