भाजपचा केंद्रिय मंत्री पुन्हा बरळला, म्हणे धर्मनिरपेक्षता घटनेतून काढून टाकू!

भाजपचा केंद्रिय मंत्री पुन्हा बरळला, म्हणे धर्मनिरपेक्षता घटनेतून काढून टाकू!

कर्नाटक – केंद्रीय कौशल्य आणि विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनंतकुमार हेगडे यांनी सेक्युलर विचारसरणीवर विश्वास असणाऱ्या व्यक्तींवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. ‘स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्षता म्हणवणाऱ्यांना त्यांचे आई-बाप कोण हे देखील ठाऊक नसते,’ असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. एवढच नाही तर आम्ही राज्यघटनेतून धर्मनिरपेक्षता हा शब्द काढून टाकणार असून त्यासाठीच सत्तेवर आलो आहोत असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

कोप्पल जिल्ह्यातील यलबुर्गा येथे झालेल्या ब्राह्मण युवा परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. ‘जर तुम्ही स्वत:ला धर्मनिरपेक्ष संबोधत असाल तर तुम्ही नेमके कोण आहात? यावर शंका निर्माण होते. धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्यांना रक्ताची ओळख नसते. त्यांची काहीच ओळख नसते, त्यामुळे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यापेक्षा धर्म आणि जातीच्या आधारावरच लोकांनी स्वतःची ओळख निर्माण करावी,’ असा सल्लाही हेगडे यांनी दिला.तसेच कोणत्याही माणसाने त्याच्या धर्माप्रमाणे किंवा जातीप्रमाणे आपली ओळख मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, ब्राह्मण आहे, लिंगायत आहे अशी करून दिली तर मला निश्चितच आनंद होईल. अशा प्रकारे ओळख करून दिल्याने आत्मसन्मान प्रस्थापित होतो. मात्र, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवाणाऱ्या माणसांमुळेच समस्या निर्माण होतात. या सेक्युलर लोकांना त्यांचे आई-बापही ठाऊक नसतात, असे विधान त्यांनी केले आहे..

COMMENTS