गिरीश महाजनांकडून बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी कमी दरात खरेदी – लालवाणी

गिरीश महाजनांकडून बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी कमी दरात खरेदी – लालवाणी

जळगाव – गिरीश महाजन यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी अतिशय कमी दरात खरेदी केल्या. तसंच पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा पॅटर्न राज्यभरात पसरवला आहे, असा आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आपल्याकडे पुराव्या दाखल सीडी आणि पेन ड्राईव्ह असून योग्य वेळ आल्यास ते उघड करु असंही ते म्हणाले.

विजय पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपली संस्था बळकावण्याचा गिरीश महाजन यांचा डाव असल्याचा आरोप केला होता. शिवाय भाजप राज्यात सत्तेत असताना पोलीस यंत्रणेचा वापर करत त्यांनी आपल्यासह अनेक जणांवर विविध आरोप देखील केले होते, असा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्यावर विविध आरोप केले.

ललवाणी यांनी म्हटले की, “बीएचआर पतसंस्थेच्या जमिनी गिरीश महाजन यांनी अतिशय कमी दरात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खरेदी केल्या आहेत. यासोबतच अनेक संस्था बळकावण्यासाठी संबंधित संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर त्यांनी पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना त्रास दिला. पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा पॅटर्न गिरीश महाजन यांनी राज्यभरात पसरवला आहे. विरोधी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना जेरीस आणण्याचं काम महाजन यांनी करुन कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भाग पाडले. ” जामनेर पालिकेत ४१ टक्के जास्तीचे टेंडर भरुन त्यांनी जामनेरमधील जनतेची फसवणूक केल्याचा प्रकार साधना महाजन यांच्या काळात सुरु असल्याचं पारस ललवाणी यांनी म्हटले आहे

दरम्यान ललवाणी यांच्या या आरोपांवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

COMMENTS