राज्यसभेची निवडणूक बिनविरोध, भाजपच्या विजया रहाटकर यांनी मागे घेतला अर्ज !

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध, भाजपच्या विजया रहाटकर यांनी मागे घेतला अर्ज !

मुंबई – 23 मार्चरोजी देशभरातून 58 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे. तर राज्यातून सहा जगांवर ही निवडणूक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. कारण भाजपाच्या उमदेवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता सहा जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात राहिल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपाकडून नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून अनिल देसाई, काँग्रेसकडून कुमार केतकर आणि राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड केली जाणार आहे.

दरम्यान भाजपकडून या निवडणुकीसाठी तीन उमेदवार देणं अपेक्षित होतं परंतु असं न करता भाजपनं चौथा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन यांच्यासह विजया रहाटकर यांचा अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आणि त्यातली त्यात काँग्रेसमध्येही चिंतेचं वातावरण पहायला मिळालं होतं. परंतु आज अखेर विजया रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसची चिंता मुक्त झाली असून राज्यातील सहाही जागांवर बिनविरोध निवडणूक होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

COMMENTS