मोदींनी पाच वर्षात काय केलं याचं पुस्तक येणार, मग करायचं काय राहून गेले हेही सांगणार का ?

मोदींनी पाच वर्षात काय केलं याचं पुस्तक येणार, मग करायचं काय राहून गेले हेही सांगणार का ?

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात काय कामगिरी केली याचं पुस्तक लवकरच येणार आहे. मेकिंग ऑफ न्यू इंडिया असं या पुस्तकाचं नाव असून ते लवकरच प्रकाशित केलं जाणार आहे. यामध्ये मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन आणि नीती आयोगाच्या सदस्यांनी एकत्रितपणे हे पुस्तक तयार केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला जात असल्याचं बोललं जात आहे. गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक निर्णयांवर आक्षेप घेण्यात आले. मोदी सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. या साऱ्या आरोपांना पुस्तकातून उत्तर देण्यात आलं असल्याची माहिती आहे.

तसेच या पुस्तकात प्रशासकीय कार्यशैली, डोकलाम वाद, नोटाबंदी व तोंडी तलाकवर अध्यादेश काढण्यामागची सरकारची भूमिकाही स्पष्ट करण्यात आली असल्याची माहिती आहे.

स्वच्छ भारत, नमामि गंगे आणि उज्ज्वला यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना, परराष्ट्र धोरण, भारत-इस्रायल संबंध, सागरमाला प्रकल्प, आधारबाबत सरकारी दृष्टिकोन, जनजागृती, वस्तू व सेवा कर, भ्रष्टाचार आणि काळा पैसा, रियल इस्टेट, दिवाळखोरी कायदे, गृहनिर्माण योजना, जीर्ण कायदे संपुष्टात आणणे याबद्दलही पुस्तकात विस्तारानं माहिती दिली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान या पुस्तकात सरकारनं पाच वर्षात केलेल्या मागिरीची माहिती दिली आहे. परंतु जनतेला दिलेली आश्वासनांपैकी किती आश्वासनं पूर्ण केली नाहीत तसेच जी जी कामगिरी अपूर्ण राहिली आहे. त्याचीही माहिती या पुस्तकात दिली जाणार का असा सवाल मोदी सरकारला केला जात आहे.

COMMENTS